अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील लोण खुर्द येथील मूळ रहिवासी व हल्ली शहरातील तांबापुरा भागातील न्यू प्लॉट भागात वास्तव्यास असलेले जवान लीलाधर नाना पाटील (वय ४१) यांचा कर्तव्यावर आसाम येथे अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. त्यांच्यावर गुरूवार दि. १८ रोजी लोण खुर्द येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
आसाम येथे सेवारत असलेले लीलाधर पाटील हे सीमा सुरक्षा बलात कार्यरत होते. बदलीच्या ठिकाणी जाणाऱ्या जवानांना खाद्यपदार्थ पोहोचवण्यासाठी जातांना मंगळवारी लष्कराच्या वाहनाचा हा अपघात झाला. वाहनाचे मागील दार उघडून ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात हवालदार पदावरील शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वडिल, आई, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर लोण खुर्द येथे शासकीय इतमामात अंत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांनी सैन्यदलात २१ वर्ष सेवा बजावली आहे. त्यांच्या मृत्यूची वार्ता तालुक्यात पसरतात मोठी शोककळा पसरली आहे. तर परिवाराने एकच हंबरडा फोडला.















