जळगाव (प्रतिनिधी) रेल्वे स्थानकावर आलेल्या पक्षकाराकडे कागदपत्र घेण्यासाठी निघालेल्या वकिलाचा भरधाव कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी नेहरू चौकात घडली. अॅड. योगेश जालमसिंग पाटील (४५, रा.दादावाडी) असे मयताचे नाव आहे. दुर्दैवी म्हणजे अवघ्या चार दिवसापूर्वी धरणगावच्या एका वकीलाचाही जळगावात असाच अपघाती मृत्यू झाला होता.
चाळीसगाव तालुक्यातील तमगव्हाण येथील रहिवाशी असलेले अॅड. योगेश पाटील हे जळगावातील दादावाडीत वास्तव्यास होते. अॅड. योगेश पाटील हे सायंकाळी त्यांच्या शाहु महाराज कॉम्प्लेक्समधील कार्यालयात असताना रेल्वे स्थानकावर आलेल्या एका पक्षकाराचा त्यांना फोन आला. फोन वरील चर्चेनुसार ते पक्षकाराकडील कागदपत्र घेण्यासाठी रेल्वे स्थानकाकडे दुचाकीने (एमएच.१९.सीई.६५११) निघाले. परंतु कोर्ट चौकाडून रेल्वे स्थानकाकडे जात असताना सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास नेहरू चौकात त्यांच्या दुचाकीला रेल्वे स्थानकाकडून टॉवर चौकाकडून निघालेल्या भरधाव कंटेनरने धडक दिली. या अपघातात ॲड. योगेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. पघाताची माहिती मिळताच जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. केतन ढाकेंसह इतर वकील बंधुंनी जिल्हा रूग्णालय गाठले. त्यानंतर शहर पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगावसह जळगावात विधीक्षेत्रात कार्यरत असणारे अॅड.विवेक पाटील यांचा चार दिवसापूर्वी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील मानराजपार्क जवळ भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अॅड.विवेक पाटील हे जळगावहून आपले कामकाज करून धरणगाव परत जात असताना मानराजपार्क जवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले होते. त्यानंतर आज पुन्हा अॅड. योगेश पाटील यांचा मृत्यू झाल्यामुळे वकील संघावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
















