नाशिक (वृत्तसंस्था) वणी-नाशिक रस्त्यावरील ओझर खेड शिवारातील हॉटेल श्रीहरीजवळील वळणावर प्रवासी वाहतूक करणारी काळीपिवळी जीप व कार यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील नाशिक शहर पोलीस कर्मचारी व महिला पोलीस असे दोघे जण ठार झाले. मंगळवारी (दि.२३) रात्री साडेनऊच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.
नाशिक बाजूने वणीकडे वेगाने येत असलेली काळी पिवळी जीप (क्रमांक एमएच १५ ई २१३२) आणि समोरून भरधाव येणारी कार (क्र. एमएच १५ डीएम ९१८३) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. यात कारमधील ज्ञानेश्वर एन. रौंदळ (वय ५२, रा. नाशिक, पोलीस मुख्यालय) व रेणुका भिकाजी कदम (महिला पोलीस) हे दोघे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली गायधनी यांनी तपासून मृत घोषित केले. सप्तशृंग गडावरून चैत्रोत्सवाचा बंदोबस्त संपल्यानंतर घरी परतताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळीपिवळी जीपचा चालक अरुण रामचंद्र गायकवाड (रा- ओझरखेड, ता. दिंडोरी, जि. नाशिक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत. दरम्यान, मृत ज्ञानेश्वर रौंदळ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, तर मृत रेणुका कदम यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे पोलीस खात्यासह शहर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.