बोदवड (प्रतिनिधी) बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुरेशा सुविधा मिळत नसल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे तालुका संघटक शांताराम कोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला होता. या आरोपांचे बाजार समिती सभापती सुधीर तराळ यांनी पत्रकार परिषदेत खंडण केले आहे.
सभापती सुधीर तराळ यांच्यासह संचालक मंडळाने शनिवारी बाजार समितीत पत्रकार परिषद घेतली. शांताराम कोळी यांचा निवडणुकीत पराभव झाला असल्याने ते मनात आकस ठेवून बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना पुरेशा सुविधा मिळत नसल्यामुळे बाजार समितीच्या आवारात शेतमालाची खरेदी-विक्री बंद असल्याचा आरोप केला होता. हा आरोप खोडून काढताना बाजार समिती यार्डमध्ये ३ते ४ वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणत आहे व दररोज बाजार समितीच्या यार्डमध्ये खरेदी-विक्री होते. त्या संबंधित शेतकरी तसेच अडते यांना पुरेशा सुविधा देखील बाजार समिती पुरवीत असल्याची माहिती दिली. तसेच दररोज शेतकरी शेतमाल आणत असल्याने अनेक हमाल, वाहतूकदार व गाडीचालक यांना रोजगार प्राप्त झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यार्डमध्ये २०१६ मध्ये ७१ हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे.
सन २०१९-२० तर २०२०-२१मध्ये सीसीआय कापूस खरेदी यंत्रणेने सुमारे ३ हजार शेतकऱ्यांचा १ लाख ८७ हजार क्विंटल कापूस बाजार समितीच्या यार्डवर खरेदी केला. त्यावेळी सुमारे ते ४०० वाहन यार्डवर येत होते. या वर्षी सी सी आय ने नोंदणी करतांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे मोबाईल वर ओटीपी आल्यावर छायाचित्र घेऊन ऑनलाईन नोंदणी केली त्या मुळे या वर्षी बाजार समितीचे आवारात वाहने आली नाहीत. बाहेर भाव जास्त मिळत असल्याने तूर, हरबरा खरेदी साठी शासकीय केंद्रावर माल येत नाही. यशोदाई अॅग्रो कंपनी बोदवड बाजार समितीचे लायसन्सधारक असून, संचालकांनी यशोदाई अॅग्रो कंपनीला प्रोत्साहित केले असल्याने कोळी यांनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न नये.
दरम्यान, तोलकाटा दुरूस्त होईपर्यंत बंद ठेवण्यात आला होता. तसेच काट्याची दुरूस्ती झाल्यानंतर तोलकाटा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. ज्या नगरसेवक व नगरसेवक पतींनी आरोप केले त्यांनी त्यांच्या प्रभागातील विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.तसेच बाजार समितीस डिसेंबर अखेर ७८,३२,८२८ रुपये उत्पन्न प्राप्त झाले असून ४,१८,३६७रुपये नफा आहे. सन २०२३ मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणे साठी प्रस्ताव करून पाठवले होते त्यामुळे शेतकऱ्यांना २ कोटी १० लाख ५ हजार ४७४ अनुदान मिळाले.शासनाने सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्र ६४ अन्वये कृषी व पणन कायद्यात सुधारणा करणे नियोजित आहे यातील काही मुद्दे शेतकरी हिताचे नसल्याने बाजार समितीने हरकती नोंदवल्या आहेत व एक दिवसीय संप सुद्धा केला आहे. बाजार समित्यांना कोणताही शासकीय वित्तपुरवठा होत नाही आलेल्या उत्पन्नात वार्षिक उत्पनावर ५% अंशदान व मार्केट फी वसूल करतांना०.०५ सुपरव्हीजन फी भरावी लागते व समितीचे खर्च भागवावे लागतात.
उपबाजार मुक्ताईनगर येथे १०००मे.टन क्षमतेचे गोदाम बांधून झाले असून आवारात व्यापाऱ्यांना माल खरेदी साठी ओटे बांधण्याचे प्रयोजन आहे तर कुऱ्हा काकोडा येथे व्यापारी संकुल व गोदाम बांधने नियोजित आहे आणि अंतुर्ली येथे जी जागा होती ज्यावर अतिक्रमण होत होते तिथे मोजमाप करून ४० गाळे असलेले व्यापारी संकुल बांधायची प्रक्रिया सुरू झाली आहे अशीही माहिती दिली.तसेच या वेळी अडते युवराज माळी यांनी रोज भाजीपाला, मिरची यांचे लिलाव रोज पहाटे होत असल्याचे सांगितले बाजार समितीचे कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेची छायाचित्रे व व्हिडीओ दाखवले. या पत्रकार परिषदेत उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, सचिव विशाल चौधरी, संचालक डॉ.आसाराम काजळे, गोपाल माळी, नगरपंचायत गटनेते जफर शेख, राष्ट्रवादी शरद पवार तालुकाध्यक्ष आबा पाटील, प्रदेश सचिव विजय चौधरी,यशोदाई अँग्रोचे निलेश पाटील,सतीश पाटील, प्रदीप बडगुजर, किरण वंजारी व अडते युवराज माळी, राजेंद्र फिरके (एणगाव), भागवत टिकारे, कर्मचारी मदन मिलांदे व शेतकरी उपस्थित होते.