चाळीसगाव (प्रतिनिधी) शहर पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यातील ३ वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातून अटक केली आहे. धीरज अरुण कानडे (वय-३६ रा. आडगाव ता. एरंडोल), असे संशयित आरोपीचे नाव आहे.
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ३ वर्षांपूर्वी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी धीरज अरुण कानडे हा फरार झाला होता. दरम्यान चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी धीरज कानडे हा जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता पथकाने आकाशवाणी चौकात सापळा रचला. संशयित आरोपी धीरज कानडे हा आकाशवाणी चौकात येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. दरम्यान पुढील कारवाई करण्यासाठी संशयित आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाणे, हेमंत पाटील यांनी कारवाई केली आहे, अशी माहिती पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क अधिकारी विभागाच्या वतीने सायंकाळी ७ वाजता दिलेल्या प्रसिद्धीपत्रकान्वये कळवले आहे.
















