नागपूर (वृत्तसंस्था) पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. न्या. जी. पी. देशमुख यांनी हा निर्णय दिला. ही घटना गिट्टीखदान येथील आहे. जुनैद ऊर्फ जिशान गुलजार ऊर्फ गुलशेर खान असे आरोपीचे नाव आहे.
पीडित तरुणी राजस्थान येथील रहिवासी आहे. ती लहानपणी नागपूरला रहात होती. नीती सिंग तिची मैत्रीण होती. पीडित तरुणी नागपूरला आल्यानंतर आवर्जून नीतीला भेटत होती. पीडित तरुणीला नागपुरातील भूखंड विकायचा असल्यामुळे तिने नीतीला ग्राहक शोधण्यास सांगितले होते. त्यानिमित्ताने पीडित तरुणी १६ जानेवारी २०२१ रोजी नीतीच्या घरी आली होती.
१८ जानेवारी रोजी पहाटे ती झोपेत असताना आरोपीने ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला, तसेच या कृत्याचे व्हिडिओ शुटिंगही केले. त्यानंतर पीडित तरुणीने धाडस करून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी चौधरी यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारच्यावतीने अॅड. वर्षा साईखेडकर यांनी कामकाज पाहिले. न्यायालयाने आरोपीवर एकूण ५१ हजार रुपये दंडही ठोठावला, तसेच दंडाची रक्कम पीडित तरुणीला भरपाई म्हणून अदा करण्याचे निर्देश सरकारला दिले. दरम्यान, जुनैदची पत्नी नीती सिंग ऊर्फ जरीन खान, मित्र तिरथ ऊर्फ सोनू राकेश डहेरिया, सागर रमेश बावणकर व अंकित बंडू लोहकरे या आरोपींना ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले.