धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बांभोरी येथील गिरणा नदी पात्रात धरणगाव पोलिसांनी पहाटे अडीच ते साडेपाचच्या दरम्यान सापळा रचून वाळू माफियांच्या टोळीवर धडक कारवाई केली आहे. धक्कादायक म्हणजे यातील एका वाळू माफियाने पोलिसांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला. तर ठेकेदार कुलभूषण पाटील यांच्यावर संघटित गुन्हेगारीसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण तब्बल १२ आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, धरणगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या या पथकाने केली कारवाई
जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दोन दिवसापूर्वी गिरणा नदी पात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपशाला प्रतिबंध करण्यासाठी उपाय योजले होते. त्याच्याच कारवाईचा भाग म्हणून पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पो.कॉ. विनोद संदांशिव, पो.ना. मिलिंद सोनार, पो.कॉ. प्रवीण पाटील, वसंत कोळी, होमगार्ड सुदर्शन पाटील, निखिल चौधरी, तुषार पाटील, राहुल पाटील यांच्या पथकाने वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या.
५ डंपर पकडले ; १२ आरोपींविरुद्ध गुन्हा
पोलीस पथकाने ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून पहाटे अडीच ते साडेपाचपर्यंत अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्याला टोळीला पकडण्यासाठी नदीपात्रात सापळा रचला. यावेळी त्यांना एम.एच. १९ झेड. ५४१७ वरील चालक प्रमोद सुभाष चव्हाण (रा.सावदे प्र.चा, ता.एरंडोल), डंपर क्रमांक एम.एच. १९ बी.एम ७५५७ वरील चालक अनिल योगराज सपकाळे (रा. आव्हाने ता.जळगाव), डंपर क्रमांक एम.एच. १९ झेड ७५५७ वरील चालक भगवान सोमा सोनवणे (रा. बांबोरी प्र.चा धरणगाव), डंपर क्रमांक एम.एच. १९ बीएम ५६५६ वरील चालक सचिन शंकर पाटील (रा.शेंदुर्णी ता. जामनेर), डंपर क्रमांक एम.एच. २० सिटी ५२४७ वरील चालक सिद्धार्थ अशोक अहिरे (रा.पिंपळकोठा प्र.चा ता.एरंडोल), मोटारसायकल क्रमांक एमएच १९ २१४७ वरील वाॅचर म्हणून काम करणारे दोन मुले मुकुंदा राजू पाटील (रा.वैजनाथ, ता.एरंडोल), दीपक धनराज पाटील (रा. वैजनाथ, ता.एरंडोल) असे मिळून आले.
पोलिसांवर डंपर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
यातील डंपर चालक सिद्धार्थ अहिरे याने पोलिसांच्या अंगावर डंपर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कोणत्याही पोलीस कर्मचारीला दुखापत झाली नाही. सदरचे डंपर तहसील कार्यालय धरणगाव येथे सुरक्षेच्या कारणास्तव लावण्यात आली आहे. डंपर चालक यांच्याकडे चौकशी करता त्यांनी मालकांचे नाव आनंद सपकाळे, बाळू चाटे, उदय राजपूत, सचिन पाटील असे सांगितले.
कुलभूषण पाटील ने केले संघटित गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त
या गुन्ह्याच्या फिर्यादीत ठेकेदार कुलभूषण पाटील (रा.जळगाव) याने मला पैसे द्या, मी नदीपात्रातून चोरलेली वाळू माझ्या ठेक्यावरून आणली, असे सांगून तुम्हाला त्याच्या पावत्या देतो असे सांगत सर्वांना एकत्र आणून संघटित गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त केले असे निष्पन्न झाले असल्याचे म्हटले आहे.
२० लाख १८ हजाराचा ऐवज जप्त
सदर गुन्ह्यात एकूण १२ आरोपींविरुद्ध धरणगाव पोलीस स्थानकात भादवि कलम ३०७, ३७९, ५११ सह गौण खनिज खनिज अधिनियम कलम २१ सह कलम २०२/१७७, १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून २५ लाख १८ हजाराचा एकूण ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यात ५ डंपर १ ब्रास वाळू मोटारसायकल, मोबाईल असा ऐवज आहे. यातील पाच चालक व मोटरसायकलवरील दोन पंटर यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहे.
नदीपात्रा जवळ विनाकारण फिरणाऱ्या डंपर, ट्रॅक्टर, मोटरसायकल चालकांवर कारवाई होणार
गिरणा काठावरून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून शासनाच्या महसूल बुडविला जातो वाढदिवस येथील सैनिक सराईत गुन्हेगार व महसूल व पोलिस प्रशासनावर वचक नेमणूक गौण खनिज चोरी करतात यापुढे नदीपात्रा जवळ फिरणाऱ्या डंपर ट्रॅक्टर मोटरसायकल यांच्यावर प्रादेशिक परिवहन विभाग महाराष्ट्र पोलीस कायदा व मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे