जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील दोघां कुविख्यात गुन्हेगारांना महाराष्ट्र विघातक कारवाई प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) स्थानबध्द करण्यात आले आहे. भुसावळातील कुविख्यात गुन्हेगार अजय उर्फ सोनू मोहन अवसरमल (24, भारत नगर, मामाजी टॉकीजजवळ, भुसावळ) तसेच अमळनेरातील कुविख्यात गुन्हेगार तन्वीर शेख मुस्ताक (27, रा. जुना पारधीवाडा, अमळनेर) यास जळगाव जिल्ह्याधिकार्यांनी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. दोघा संशयितांची मध्यवर्ती कारागृह, मुंबईत रवानगी करण्यात आली आहे.
अमळनेरच्या तन्वीरविरोधात 13 गुन्हे
अमळनेर शहरातील तन्वीर हा पेट्रोल पंपाचे मालक बाबा बोहरी यांच्या खुनातील आरोपी आहे शिवाय त्याच्याविरोधात 13 गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, घरफोडी, चोरी, दंगल, शासकीय कामात अडथळा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अमळनेरचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे, उपनिरीक्षक अनिल भुसारे, दीपक माळी, रवींद्र पाटील, किशोर पाटील, सिद्धार्थ शिसोदे आदींनी संशयिताला स्थानबद्ध करण्याबाबत प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याची पडताळणी होवून प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आल्यानंतर गुरुवारी सायंकाळी स्थानबद्धतेचे आदेश निघाले.
भुसावळातील अजयविरोधात 15 गुन्हे
भुसावळ शहरातील कुविख्यात गुन्हेगार अजय अवसरमल विरोधात तब्बल 15 गुन्हे दाखल आहेत. त्यात जबरी लूट, दरोडा, आर्म अॅक्ट आदी गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. वारंवार संशयित गुन्हे करीत असल्याने त्यास स्थानबद्ध करण्याबाबत बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव भुसावळ पोलि उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, युनूस शेख इब्राहीम, सुनील पंडित दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील यांनी त्यावर कामकाज करीत तो जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे सादर केला व तेथून तो जिल्हाधिकार्यांकडे सादर केल्यानंतर संशयिताला स्थानबद्ध करण्याबाबत आदेश पारीत करण्यात आले. दरम्यान, भुसावळातील पाचव्या संशयिताविरोधात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून आगामी काळात आणखी चौघांविरोधात कारवाई शक्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली.