जळगाव ( प्रतिनिधी ) : महापालिकेच्या निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतमोजणीला दहा दिवस उलटले तरी बहुतांश उमेदवारांनी महापालिकेकडे निवडणूक खर्च सादर केलेला नाही, त्यामुळे वेळेत खर्च सादर न केल्यास संबधित उमेदवारांवर कायदेशिर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली.
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ३३३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी भारतीय जनता पार्टीचे ६ व शिवसेना शिंदे गटाचे ६ उमेदवार बिनविरोध झाले होते. तसेच ३२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. महापालिकेच्या ७५ पैकी ६३ जागांसाठी दि.१५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून दि.१६ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. रिंगणात असलेल्या उमेदवारांना निवडणूक खर्चाची ९ लखांपर्यंत मर्यादा होती. सदर खर्च तातडीने सादर करणे बंधन कारक आहे. परंतु मतमोजणी होऊन दहा दिवस उलटले तरी, निवडणूक लढविणाऱ्या ३२१ उमेदवारांपैकी फक्त १५ उमेदवारांनी आतापर्यंत निवडणूक खर्च सादर केलेला आहे. उर्वरीत उमेदवारांनी अद्याप पर्यंत खर्च सादर केलेला नसल्यामुळे त्यांनी तातडीने खर्च सादर न केल्यास संबधितांवर कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या संदर्भात निवडणूक आयोगाला देखील कळविण्यात येणार आहे.
















