कोलकाता (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोलकात्यातील ब्रिगेड मैदानावर जंगी सभा होत आहे. विशेष म्हणजे या सभेला भाजप नेत्यांसोबत ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे उपस्थित आहेत. मिथुन चक्रवर्ती यांनी पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू होण्यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
तत्पूर्वी आज सकाळीच मिथुन चक्रवर्ती यांनी भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली होती. कैलास विजयवर्गीय हे मिथुन चक्रवर्ती यांच्या बेल्गाचिया येथील निवासस्थानी गेले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली. तेव्हा मिथुन चक्रवर्ती आज भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जोरदार प्रचार सुरू आहे. आठ टप्प्यात मतदान होणार असून, उमेदवारांच्या नावांचीही घोषणा केली जात आहे. त्यामुळे आता बंगालमध्ये प्रचाराचा पारा वाढताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (०७ मार्च) पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून, ते कोलकातामध्ये प्रचारसभेला संबोधित करणार आहे. याचदरम्यान अभिनेते मिथून चक्रवर्ती त्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. हे आता खरं ठरलं आहे. मिथून चक्रवर्ती यांनी पंतप्रधानांच्या सभेपूर्वी पक्षात प्रवेश केला.
२०११ मध्ये मिथुन यांनी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूलने त्यांना राज्यसभेवर पाठवल होतं. मात्र, २०१६ मध्ये मिथुन यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकीय सन्यास घेतला होता. मात्र, भागवत यांच्या भेटीनंतर मिथुन चक्रवर्ती भाजपात प्रवेश करुन पुन्हा एकदा राजकारणात पाऊल ठेवणार असल्याच्या चर्चा सुरू झाली होती. आज पुन्हा एकदा मिथून यांनी बंगालच्या राजकारणात पाऊल ठेवलं आहे.