अमळनेर (प्रतिनिधी) राज्यासह जळगाव जिल्ह्यात आणि अमळनेर तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याला रोखण्यासाठीच शासन व प्रशासनाने काही निर्बंध लावले असून ते आपल्या सुरक्षेसाठीच असल्याने कोणत्याही परिस्थितीत नियम पाळलेच पाहिजे असे आवाहन आ. अनिल पाटील यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ. अनिल पाटील यांनी म्हटले आहे की, याआधी कोरोना लॉकडाऊनचे संकट आपण अमळनेरवासीयांनी जवळून अनुभवले असून दुर्देवाने यातून अनेकांना आपल्यापासून हिरावून घेतले आहे, तर अनेकांना बेरोजगारीचे चटके बसले आहेत, तशी वेळ पुन्हा आपल्यावर येऊ नये यासाठी आपला प्रयत्न आहे, जेमतेम आता गाडी रुळावर आली असून रोजगाराचे चक्र संथगतीने का होईना सुरू झाले आहे. हे चक्र थांबू नये यासाठी काही नियम आपल्याला पाळायचे आहेत. यात प्रामुख्याने घराबाहेर पडताना कुणीही विनामास्क बाहेर पडू नये, आवश्यकता नसल्यास बाहेरगावी जाणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी मुळीच जाऊ नये, सार्वजनिक वाहनात बसताना काळजी घ्यावी. प्रामुख्याने काही दिवस मोठे विवाह सोहळे टाळणेच योग्य असेल. विवाह सोहळ्यावरील निर्बंधांमुळे मंगल कार्यालय चालक, केरटर्स, वाजंत्रीवाले, डेकोरेटर्स यांचे मोठे नुकसान असल्याची जाणीव आपल्याला आहेच. परंतु काही गोष्टीना नाईलाज असून सार्वजनिक आरोग्य जपणेच आज महत्वाचे आहे. त्यामुळे तेवढे सहन करावेच लागेल, अनेक मंगल कार्यालय व विवाह सोहळ्याकडे काल पोलीस व न प प्रशासनातील पथकांनी काल ५० पेक्षा अधिक गर्दी अथवा विनामास्क लोक आढळल्याने दंडात्मक कारवाई केली आहे. पहिला दिवस असल्याने प्रशासनाने थोडी नरमाईची भूमिका घेतली. परंतु आता कदाचित यापुढे ते कठोर होऊ शकतील यासाठी कृपया नियमांचे पालन करा आणि आपली भूमी सुरक्षित ठेवा असे विनम्र आवाहन आ. अनिल पाटील यांनी केले आहे.