गुवाहाटी (वृत्तसंस्था) कोरोना काळात अनेक समस्यांचा लोकांना सामना करावा लागत आहे. या जिवघेण्या आजारासोबतच माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना पाहायला मिळाल्या आहेत. कुणी आपल्याच पित्याचा अंत्यसंस्कार करण्यासाठी नकार देत आहे तर कुणी कोरोना झाला म्हणून घराबोहर काढत आहे. असे असताना मात्र एका सुनेनं आपल्या कोरोनाबाधीत सासऱ्याला स्वतःच्या खांद्यावर उचलून रुग्णालयात घेऊन गेल्याची कौतुकास्पद घटना पहावयास मिळाली आहे.
दरम्यान या सुनेचा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. आसाममधील ही महिला असून तिने केलेल्या या धाडसाचे सगळीकडेच कौतुक होताना दिसून येत आहे. निहारीका असे या सुनेचे नाव आहे. भाटीगावच्या राहा येथील रहिवासी आहेत. निहारीका हिच्या ७५ वर्षाय सासऱ्यास करोना विषाणुची लागण झाली होती. तिचा पती कामानिमित्त घरापासून दूर राहातो. त्यामुळे निहारीकाने सासऱ्यांना खांद्यावर उचलून उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या सुनेला देखील कोरोनाची लागण झाली.
यानंतर स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी थुलेश्वर दास यांनी जिल्हा कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यास सांगितलं आणि निहारीकाला होम आयसोलेशनमध्ये राहाण्याचा सल्ला दिला. मात्र, आपल्या वृद्ध सासऱ्यांना एकट्याला रुग्णालयात पाठवण्यास निहारीकानं नकार दिला. त्यामुळे, डॉ. संगीता धर आणि आरोग्य कर्मचारी पिंटू हिरा यांनी प्राथमिक वैद्यकीय उपचार करत दोघांनाही रुग्णवाहिकेनं नागाव भोगेश्वरी फुकानानी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली. निहारीकानं आपल्या पतीच्या अनुपस्थितीत सासऱ्यांची घेतलेली काळजी आणि कोरोना काळातही त्यांच्यासाठी केलेली धडपड यांचं सगळ्यांकडून कौतुक होत आहे.