जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व माजी आमदार ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांची बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना स्वबळावरती निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचे नेते व माजी आमदार ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. ॲड.जयप्रकाश बाविस्कर हे राज ठाकरे यांच्यासोबत गेल्या ३५ वर्षापासून खांद्याला खांद्या लावून काम करत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक निष्ठावंत नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
राज्यातील बदललेल्या गढूळ राजकीय स्थितीकडे मनसे मोठी संधी म्हणून पाहत आहे. त्यामुळं २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मनसेनं आतापासून तयारी सुरु केल्याचे संकेत दिसून येत आहेत. मनसेकडून करण्यात आलेल्या विविध लोकसभा निहाय संघटकांच्या नियुक्तीमुळं आगामी लोकसभा निवडणुकीत बुलढाण्यासह राज्यातील विविध मतदारसंघातील निवडणुकीत मनसेचं रेल्वे इंजिन धावतानांच दिसेल अशी मनात खूणगाठ बांधून तळागाळातील महाराष्ट्र सैनिक मतदारांशी संपर्क करीत आहे.
मतदार संघामध्ये विधानसभा निहाय बैठका घेऊन बुलढाणा लोकसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खासदार निवडून आणणार असल्याचा संकल्प मनसे नेते माजी आमदार ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव जिल्ह्यातर्फे ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांच्या नियुक्तीचे अभिनंदन करण्यात आले आहे.