मुंबई (वृत्तसंस्था) खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) दोघे सध्या भायखळ्याच्या तुरुंगात असून वकिलांनी नवनीत राणांच्या तब्येतीबद्दल तुरुंग अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे.
आमच्या क्लायंटला म्हणजेच नवनीत राणांना स्पॉन्डिलायसीसचा आजार आहे. त्यांना तुरुंगात जमिनीवर बसायला आणि झोपायला लावले. त्यामुळे हा आजार अधिक बळावला आहे. डॉक्टरांनी लेखी देऊनही त्यांच्या सीटी स्कॅनच्या विनंतीकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यांना काही झाले तर तुरुंग अधिकारी जबाबदार असेल, असं पत्र खासदार नवनीत राणांच्या वकिलांनी भायखळा कारागृहाच्या अधीक्षकांना लिहिलं आहे.
राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर राणा दाम्पत्यानं मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. त्यावर शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली. यावेळी फक्त जामीनच नाहीतर तुरुंगात घरचं जेवण मिळावं, यासाठी देखील नवनीत राणांनी विनंती केली होती. त्यावर सुनावणी झाली. पण, न्यायालय आज त्यावर निकाल देणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याची पुन्हा तुरुंगात रवानगी होते, की त्यांना जामीन मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
















