मुंबई (वृत्तसंस्था) गिरीश महाजन यांनी आज तुमची तू तू मैं मैं बंद करा अशा शब्दात एकनाथराव खडसेंना एकप्रकारे इशारा दिला होता. त्यावर आता खडसे यांनीही प्रत्युत्तर दिलंय. गिरीश महाजनांनी माझ्याविषयी जे वक्तव्य केलं ते धमकी समजायचं की सल्ला समजायचा? मंत्री झाल्यावर अशा धमक्या येत असतात. विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न असतो. मी तुमचं काम करण्यास कोणती अडचण आणली नाही, अशा शब्दात खडसे यांनी महाजनांवर निशाणा साधलाय.
एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप नेत्या आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरही भाष्य केलंय. आता असं झालं आहे की पंकजाताईंची काळजी भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते करायला लागले आहेत. गिरीश महाजनांपासून तर भाजपचे सर्वच नेते पंकजाताईंची काळजी घेत असून तिला सल्ला देत आहेत की तुला न्याय दिला जाईल. त्यामुळे तिच्या पाठीशी सर्वजण उभे असतील तर तिला न्याय मिळाला अशी अपेक्षा करतो, असा टोला खडसेंनी लगावलाय.
मंत्रिमंडळाचा विस्तार अपूर्ण दिसतोय. पुढच्या कालखंडात आणखी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराशी जे कुणी संबंधित आहेत, पंकजा मुंडे असो वा इतर त्यांच्यावर सातत्याने अन्याय केला जात आहे. आताही पंकजाताईंना मंत्रिमंडळात घेतील की नाही याबाबत शंका आहे. पंकजा मुंडे यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आता त्यांनी अजून वाट न पाहता वरिष्ठांना भेटावं, असा सल्ला एकनाथराव खडसे यांनी पंकजा मुंडेंना दिलाय.