जळगाव (प्रतिनिधी) जेवण करत असताना अचानक सापाने दोन जणांना दंश केला. मात्र, यातील एकाने थेट जिवंत सापाचे तोंड धरून जिल्हा रुग्णालय गाठल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, जिवंत सापाला पकडून या दोघा जखमींनी तब्बल ८ किलोमीटर प्रवास केला.
यासंदर्भात अधिक असे की, जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी तांडा येथील रहिवासी जोरसिंग गबरु राठोड (वय ४८), बळीराम जाधव (वय ५०) या दोघांना सायंकाळी सापाने चावा घेतला, जोरसिंग ने साप पकडून ते दोघे थेट जिल्हा रुग्णालयात आले. डॉ. स्वप्नील कळस्कर, डॉ. संदीप पाटील यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले. साप जिवंत असल्याने रुग्णालयात भीती पसरली होती. नंतर या सापाला एका पिवळ्या कचऱ्याच्या पिशवीत ठेवण्यात आले. यानंतर डॉ. प्रसाद खैरनार आणि डॉ. विशाल आंबेकर यांनी दोघांवर उपचार केले. दोघांच्या हाताला सापाने चावा घेतला आहे.