नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात निवडणुकीसाठी मोफत लसीचा मुद्दा अग्रस्थानी आहे. अशातच अमेरिकेतही करोना लसीवरून राजकारण सुरु झाले आहे. डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार जो बायडेन यांनी निवडून आल्यास कोरोनावरील लस सर्वांना मोफत देणार असल्याची घोषणा केली आहे. अध्यक्षीय वादविवादामध्ये बायडेन यांनी ही घोषणा केली.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक राहिले असताना राजकीय प्रचार शिगेला पोहचला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेला करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सोडून दिल्याचा आरोप बायडेन यांनी केला आहे.
तसेच, डोनाल्ड ट्रम्प फेस मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नाही. करोना विषाणू संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे ट्रम्प पालन करत नाहीत, असादेखील आरोप बायडेन यांनी करत हा प्रचाराचा मुद्दा बनवला होता. दरम्यान, भारतातही निवडणुकीसाठी मोफत लसीचा मुद्दा अग्रस्थानी आहे. बिहार निवडणुकीसाठी भाजपने मोफत लस देण्याचे आश्वासन दिले आहे. तर तामीळनाडूत प्रत्येकाला करोना लस मोफत देण्याची घोषणा त्या राज्याचे मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांनी केली आहे.