मुंबई (वृत्तसंस्था) टीईटी घोटाळ्यात (TET exam)कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावं समोर आली होती. आता आमदार रमेश बोरणारे यांच्या मुलीचं नाव देखील टीईटी घोटाळ्यात समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. यामुळे शिंदे गटाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारे यांच्या मुलीचं नाव टीईटी घोटाळ्यात समोर आलं आहे. रमेश बोरणारे यांच्याही मुलीकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र आहे आणि बोगस प्रमाणपत्राच्या आधारे रमेश बोरणारे यांची मुलगी नोकरीवर रुजू झाली असल्याची माहिती आहे. आमदार रमेश बोरणारे यांच्या मुलीकडे टीईटी परीक्षा पास झाल्याचे बोगस प्रमाणपत्र आहे. याच प्रमाणपत्राच्या आधारे बोरनारे (Ramesh Bornare) यांच्या मुलीला नोकरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आमदार रमेश बोरनारे अडचणीत आले आहेत. यावर आता त्यांच्याकडून काय भूमिका घेण्यात येणार, हे पाहावे लागेल. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहे टीईटी घोटाळा?
पुणे सायबर सेल पोलिसांनी टीईटी परीक्षेचा गैरव्यवहार उघडकीस आणला होता. या प्रकरणात तपास करत असताना २०१९-२० च्या टीईटी परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ परीक्षार्थ्यांना पात्र केल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील सात हजार ८०० परीक्षार्थी अपात्र असतानाही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०१९-२० मध्ये पैसे देऊन पात्र ठरलेल्या सात हजार ८०० उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पोलिस व शिक्षण विभागाकडून पडताळणी करण्यात आली होती.