जळगाव (प्रतिनिधी) जून्या वादातून दोन कुटुंबांमध्ये वाद होवून झालेल्या हाणामारीत एकनाथ निंबा गोपाळ (वय ५५, रा. बिलवाडी, ता. जळगाव) यांचा मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद दुसऱ्या दिवशी उमटले. मुख्य सुत्रधाराला अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी सोमवारी सकाळी प्रचंड रोष व्यक्त केला. त्यानंतर सुमारे ४० मिनिटे महामार्ग रोखून धरला होता. त्यानंतर दुपारी मृतदेह ताब्यात घेत नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी बिलवाडीत पोहचले. मृतदेह गावात पोहचताच जमाव अधिकच आक्रमक होवून त्यांनी संशयितांच्या तीन घरांची तोडफोड केली. घरातील साहित्यासह घराबाहेर लावलेल्या दुचाकी जाळून टाकत त्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला.
जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथे दोन कुटुंबामध्ये जूना वाद आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास एकनाथ गोपाळ हे रस्त्याने जात असतांना ते धुंकले. त्या कारणावरुन पुन्हा त्या दोन कुंटुंबातील वाद उफळून आला. त्यांच्यामध्ये झालेल्या हाणामारीत एकनाथ गोपाळ यांचा मृत्यू झाला तर दोन्ही गटातील १२ जण गंभीर जखमी झाले होते. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर या ठिकाणी मोठी गर्दी होऊन दोन्ही गट रुग्णालयातही आपसात भिडले. त्यामुळे संध्याकाळपर्यंत तणावाचे वातावरण होते. त्यानंतर मृतदेहदेखील ताब्यात घेतला नव्हता. दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी पुन्हा मयताचे नातेवाईक, गावकऱ्यांचा मोठा जमाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहचल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आंदोलनात प्रवेशद्वार तुटल्याने महिला पोलीस जखमी
खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्याच्या मागणीसाठी जमाव जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठाण मांडून बसला होता. या ठिकाणी गर्दी वाढत असल्याने प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. मात्र जमावाने ते लोटून आंदोलनासाठी प्रयत्न केले, त्यात प्रवेशद्वाराचे एक लोखंडी फाटक तुटून खाली पडल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्या. जमावाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केल्यानंतर संतप्त जमाव हा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. जमाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चालून जात असताना स्वातंत्र्य चौकात त्यांनी रास्तारोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर जमाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहचला. तेथे प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने कार्यालयासमोर रोष व्यक्त केला.
ग्वाही नंतर मृतदेह घेतला ताब्यात
जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी रविवारी घेतली होती. त्यानंतर सोमवारी सकाळीही हीच मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यानंतर आंदोलनस्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या ग्वाहीनंतर दुपारी १२ वाजता मृतदेह ताब्यात घेतला.
जमावाने ४० मिनिटे रोखून धरला महामार्ग
जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद असल्यामुळे संतप्त जमाव हा आकाशवाणी चौकात पोहचला. त्यांनी चौकातील सर्व रस्ते रोखून धरल्यामुळे त्याठिकाणाहून होणारी वाहतुक ठप्प झाली होती. यावेळी जमावाने मुख्य सूत्रधाराला आताच आणा, आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांना येथे बोलवा, अशा घोषणा देत रास्ता रोको केला. सुमारे ४० मिनिटे महामार्ग रोखून धरल्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही वाहने रिंगरोडकडून वळविण्यात आले. त्यामुळे बसेस, कार, दुचाकी, मालवाहू वाहने रिंगरोडने वळवली होती.
सात जणांना पोलीस कोठडी
बिलवाडी हत्या प्रकरणात किरण देवीदास पाटील (वय २८), कल्पेश रतिलाल पाटील (वय २६), ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील (वय ४९), दिपक ज्ञानेश्वर पाटील (वय २०), हितेश रोहिदास पाटील (वय २१), प्रवीण सुभाष पाटील (वय ३३), ईश्वर उर्फ शुभम जीवन पाटील (वय २६, सर्व रा. बिलवाडी, ता. जळगाव) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
घरांची तोडफोड करत दुचाकी पेटवल्या
मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी तो बिलवाडी येथे नेण्यात आला याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मृतदेह गावात पोहचताच संतप्त झालेला जमाव पुन्हा आक्रमक झाला आणि त्यांनी संशयितांच्या घरावर दगडफेक करीत तोडफोड केली. यावेळी पोलिसांनी जमावाल रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु जमाव अधिकच आक्रमक असल्यामुळे त्यांनी घरातील साहित्य बाहेर काढून तेथे उभ्या असलेल्या दुचाकीची तोडफोड करीत त्या जाळून टाकल्या.
गिरीश महाजन घटनास्थळी पोहचून केले सांत्वन
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दुपारी बिलवाडी येथे घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर मयताच्या कुटुंबियांचे देखील त्यांनी सांत्वन करीत फरार असलेल्या संशयितांना अटक करण्याचे आदेश मंत्री महाजन यांनी पोलीस विभागाला दिले.
















