पिंपरी (वृत्तसंस्था) कोणीतरी करणी केली असून, गुप्त व अघोरी पूजा करावी लागेल अन्यथा मृत्यू होईल, अशी भीती दाखवून एकाकडून सात लाख २१ हजार ४९१ रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. उद्योगनगर, चिंचवड येथे नोव्हेंबर २०२१ ते ८ जानेवारी २०२२ या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला. याप्रकरणी ज्योतिष महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किमदेवांशी सोलंकी (रा. उद्योगनगर, चिंचवड), असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या ज्योतिष महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एका ५२ वर्षीय व्यक्तीने शनिवारी (दि. ५) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या घरच्यांना होणारा मानसिक त्रास कमी होण्यासाठी आरोपी ज्योतिष महिलेने अघोरी पूजा करण्याचे सांगितले. कोणीतरी एकाने फिर्यादी व त्यांच्या घरच्यांवर करणी केली आहे. फिर्यादीवर जास्त मोठ्या प्रमाणात करणी केली असल्याने गुप्त व अघोरी पूजा करावी लागेल. अघोरी पूजा नाही केली तर मृत्यू होईल, अशी भीती आरोपी ज्योतीष महिलेने दाखविली. फिर्यादीकडून वेळोवेळी सात लाख २१ हजार ४९१ रुपये बँकेच्या खात्यावर ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात घेतले.
फिर्यादीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार भादंवि कलम ४२०, ३८७, तसेच महाराष्ट्र बळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व समूळ उच्चाटन करण्याबाबतचे अधिनियम २०१३ घ्या कलम ३ अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक भारत वारे तपास करीत आहेत.