पुणे ( वृत्तसंस्था) दिल्लीच्या सीमेवर गेल्या १० दिवसांपासून हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. पण काही केल्या हा कायदा रद्द होणार नाही असं ठाम वक्यव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना कायदा रद्द होणार नसल्याचं ठणकावून सांगितलं आहे. केंद्राने कृषी कायद्यावर शहाणपणाची भूमिका घ्यावी असं पवारांनी म्हटलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटलांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही. जे जुन्या कायद्यात होतं तेचं आहे. फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली जी आधी नव्हती असं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात आजोयित कार्यक्रमात बोलत होते. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रातूनही सत्ताधारी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. पण असं असलं तरी कायदा रद्द होणार नाही असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘प्रश्न फक्त एमएसपीचा होता. केंद्र सरकार ऑन पेपर एमएसपीची रक्कम लिहून द्यायला तयार आहे. तरीही आपण आंदोलन करणार, भारत बंद करणार याला काही अर्थ नाही. केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द होणार नाही. फक्त कायद्यात बदल केला जाईल.’ असंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं.