मुंबई (वृत्तसंस्था) अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. नामांतराच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर आता अहमदनगर जिल्हा यापुढे अहिल्यानगर म्हणून ओळखला जाणार आहे. नामांतराच्या या निर्णयाचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्वागत करून आनंद व्यक्त केला. अहिल्यादेवींच्या जयंतीदिनाचे यंदाचे ३०० वे वर्षे असून त्यावेळी हा निर्णय होणे, ही एक ऐतिहासिक घटना असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
यासंदर्भात बोलताना विखे-पाटील म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत होती. चोंडी येथे झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याची घोषणा केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही नामांतराच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याचे विनंतीपत्र दिले होते. यापूर्वी रेल्वे मंत्रालयाने अहिल्यानगर नावाला कोणतीही हरकत नसल्याचे राज्य आणि जिल्हा प्रशासनाला कळवले होते.
केंद्र सरकारने अहिल्यानगर नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयाबद्दल महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आनंद व्यक्त केला. नामांतर होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले. हा निर्णय होण्यासाठी योगदान देता आले याचा आनंद आहे. महायुती सरकारने दिलेल्या शब्दांची वचनपूर्ती केल्याचेही त्यांनी सांगितले.