अहमदाबाद (वृत्तसंस्था) एकाच कुटुंबातील ४ जणांची हत्या करून त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवलेल्याची घटना गुजरातची राजधानी अहमदाबाद घडली आहे. अहमदाबादमध्ये ओढव नावाचा एक भाग आहे. या परिसरात ही घटना घडली असून, या हत्याकांडामुळं अहमदाबाद (Ahmedabad) हादरलं आहे. घरात झालेल्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अहमदाबादमध्ये ओढव नावाचा भाग आहे. याच भागात दिव्य प्रभा नावाची सोसायटी आहे. ह्या सोसायटीतल्या एका घरातून दुर्गंध यायला लागला. स्थानिकांना काही तरी काळंबेरं आल्याचा संशय आला. ज्या घरातून दुर्गंध येत होता, त्या घरात रहिवाशांनी, सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांनी डोकावण्याचा प्रयत्न केला पण घराला बाहेर कुलूप होतं. पण घरासमोर एकदम सन्नाटा होता. स्थानिकांनी मग सरळ पोलीसांना फोन करुन माहिती दिली. पोलीसांनीही मग वेळ न लावता दिव्यप्रभा सोसायटी गाठली. घराचं कुलूप तोडलं. काही प्रत्यक्षदर्शी सोबत ठेवले. घराचं दार उघडताच आतून दुर्गंधीचा लोट बाहेर आला. मस्तकापर्यंत तो झोंबेल अशी स्थिती होती. पोलीसांनी तसेही आधीच मास्क, रुमाल नाकाला लावलेलेच होते. काही तरी भयंकर घरात घडल्याचा अंदाज पोलीसांना आलाच. त्यातल्या काहींसाठी हा अनुभव नवा नव्हता. घर मोठं होतं. तीन चार दिवसापासून ते उघडलं गेलं नसावं हे आतल्या परिस्थितीवरुन लक्षात येत होतं. पोलीसांनी संपूर्ण घराची तपासणी केली तर त्यांच्या जे डोळ्याला दिसलं त्यानं हादरलेच. घरातल्या वेगवेगळ्या खोलीत एक नाही, दोन नाही तर चार मृतदेह चित्रविचित्र अवस्थेत पडले होते. बहुतांश मृतदेह सडलेही होते. त्यातूनच नाकाला झोंबणारा वास सुटलेला होता.
पोलीसांनी शोधाशोध घेतल्यानंतर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे एक ‘मराठी’ कुटुंब आहे. म्हणजेच कुटूंब मराठी आहे की त्यांचं आडनाव मराठी आहे याची अजून सविस्तर माहिती नाही. पण कुटुंबातल्या वादातूनच विनोद मराठी ह्या संशयीत आरोपीनंच स्वत:च्या कुटुंबाचा खात्मा केल्याची प्राथमिक माहिती आहे. विनोद मराठीनेच पत्नी सोनल मराठी, मुलगी प्रगती, मुलगा गणेश आणि सासू सुभद्राबाई यांचा खून केल्याचा संशय आहे. पण सध्या तरी विनोद मराठी हा फरार आहे. हे हत्याकांड चार दिवसांपूर्वी झाल्याचा संशय आहे. सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले गेलेत.