अहमदनगर (वृत्तसंस्था) राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार व माहितीचा अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपी एका राजकीय पक्षाशी संबंधीत असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी हस्तगत केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दातीर यांचे दि. ६ एप्रिल रोजी काल दुपारी अपहरण झाले होते. रात्री उशिरा कॉलेज रोड परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. पत्रकार दातीर मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडने आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. सातपीर बाबा दर्गाजवळून जात असताना एका चार चाकी वाहनातून आलेल्या लोकांनी त्यांना मारहाण करून गाडीत बसविले आणि निघून गेले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तेथे धाव घेतली. दातीर यांची दुचाकी आणि पायतील चप्पल घटनास्थळीच आढळून आली. दातीर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद होता. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध मोहीम हाती घेतली. सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा तपास लागला. पोलिसांनी ते ताब्यात घेतले. मात्र, आरोपी मिळाले नाहीत. आरोपी एका राजकीय पक्षाशी संबंधीत असल्याची माहिती पुढे आली आहे. दातीर यांनी एका प्रकरणात माहिती आधिकार वापरून केलेल्या पाठपुराव्यामुळे अडचणीत आल्याच्या कारणातून त्यांनी ही हत्या केली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. त्यांची पत्नी सविता रोहिदास दातीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.