मुंबई (वृत्तसंस्था) अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. सोमय्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे.
किरीट सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. अजित पवारांना माझा प्रश्न आहे की जरंडेश्वरचा मालक कोण आहे? कीती हजारांचे घोटाळे केले? या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत मी पवारांना प्रश्न विचारत राहणार. आशा करतो की त्यांच्यात या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत असावी, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला. बुधवारी मी पुण्यात जाणार आहे. यावेळी अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची आणखी एक पोलखोल करणार आहे. यांनी इतके घोटाळे केले आहेत, लूट माजवली. पवार शेतकरी दादा, शेतकरी दादा म्हणत असतात. पण रोहीत पवार, सुनेत्रा पवार यांच्या नावाने कारखाने आहेत. लुटतात ते, अशी टीकाही त्यांनी केली.
पवारांच्या निकटवर्तीयांवर चार दिवसांपासून रेड सुरू आहे. त्यामुळे आता हा घोटाळा पाच हजार कोटींपेक्षा मोठा घोटाळा आहे. त्यामुळे यांना तुरुंगात जावच लागेल. कायद्याने होत असलेल्या कारवायांना सामोरे जावंच लागेल. त्यांनी लुटल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल असं मविआला स्वप्नातही वाटलं नसेल. पण मोदींनी ते करून दाखवलं, असंही ते म्हणाले.
















