मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या महाविकासआघाडीचे नेते आणि मंत्री अजित पवार हे सुरक्षेशिवाय दोन तास गायब असल्याचा धक्कादायक दावा महाविकास आघाडीमधल्याच एका वरिष्ठ मंत्र्याने केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या सर्वाधिक तक्रारी या राष्ट्रवादी काँग्रेस आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याबाबत आहेत. अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नसल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी अजित पवार यांना व्हिलन ठरवलं आहे. अजित पवार कोरोना झाल्यामुळे सध्या क्वारंटाईन आहेत. पण त्याआधी अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटामागे भाजपचा हात दिसत नाही, असं वक्तव्य केलं, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यानंतर शरद पवारांनी या सगळ्यामागे भाजपचा हात असल्याचं सांगत अजित पवारांचा मुद्दा खोडून काढला. या वक्तव्याबाबत अजितदादांना विचारण्यात आलं असता, शरद पवारांचा शब्द अंतिम असतो, त्यावर बोलण्याची माझी लायकी नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
मंत्रिमंडळ बैठकीलाही दांडी अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीला येत नाहीत, असं फारच कमी वेळा घडलं आहे. पण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार गैरहजर राहिले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही अजितदादांनी या बैठकीला हजेरी लावली नाही. 2019 सालचं बंड महाराष्ट्रात 2019 च्या निवडणुकांनंतर अशाचप्रकारे सत्तासंघर्ष सुरू होता, तेव्हा अचानक देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. शरद पवार यांनी अजितदादांचं हे बंड मोडून काढलं आणि फडणवीस-पवारांचं हे सरकार तीन दिवसांमध्येच कोसळलं होते.