मुंबई (वृत्तसंस्था) भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव मंजूर केल्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करणारं पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी सचिन वाझे प्रकरणातल्या अनेक गोष्टीही गृहमंत्र्यांसमोर मांडल्या आहे. सचिन वाझे याला २००४ सालीच निलंबित करण्यात आलं होतं. मात्र, २०२० मध्ये सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने त्याला पुन्हा पोलीस दलात रुजू करुन घेतलं असा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर वाझे याने चौकशीदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांकडून १०० कोटी वसूल करण्यास सांगितलं असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
भाजप कार्यकारणीत नेमका काय ठराव मांडला होता ?
‘महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे सातत्यानं उघडकीस येत आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा धक्कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे. गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेनं वसुलीचा आरोप केला. परमबीरसिंग यांच्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी ही कार्यकारिणी करत आहे, असा ठराव भाजप कार्यकारणीत मांडला होता.