मुंबई (वृत्तसंस्था) दोन दिवसांपूर्वी राज्यातील कोळसाचा साठा (Coal Storage) फार कमी असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. विशेष म्हणजे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेली बातमी शेअर करत लोड शेडिंगच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
दरदिवसा दिवसा किंवा रात्री तब्बल आठ तास लोडशेडिंग
विशेष म्हणजे एका वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेल्या त्या बातमीत राज्यात दरदिवसा दिवसा किंवा रात्री तब्बल आठ तास लोडशेडिंग राहील. याचाच अर्थ दिवसभर तब्बल आठ तास लाईट नसेल. त्यामुळे चिंता वाढली आहे. या सगळ्या घडामोडी पाहता आता आपली वाटचाल नेमकी कोणत्या दिशेला सुरु आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे भर उन्हाळ्यात अशाप्रकारचं वीजसंकट कोसळल्यास सर्वसामान्यांच्या अंगाची लाहीलाही होण्याची दाट शक्यता आहे. राज्य आणि केंद्र सरकार यावर नेमकं काय तोडगा काढतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“सावध! ऐका पुढल्या हाका. टँकरमुक्तीतून पुन्हा टँकरयुक्त, भारनियमनमुक्तीतून पुन्हा भारनियमनाकडे, राज्यात केवळ आणि केवळ भ्रष्टाचार, ‘नो गव्हर्नन्स’मुळे जनता हैराण, परिणाम दिसू लागले आहेत. अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
तर मोठं वीजसंकट कोसळू शकतं – नितीन राऊत
दरम्यान, राज्यात फक्त दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. त्याचबरोबर तीन दिवस पुरेल इतकं पाणी शिल्लक आहे. केंद्र सरकारने राज्यासाठी कोळसा उपलब्ध करुन दिला नाही तर मोठं वीजसंकट कोसळू शकतं, अशी माहिती स्वत: ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल दिली होती. यावर आज पुन्हा नितीन राऊत यांनी यासंदर्भातली आज पुन्हा माहिती दिली.