अकोला (वृत्तसंस्था) जुने शहर पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या हिंगणा फाटाजवळ ३० वर्षीय शेख शाहरूख उर्फ फारूख नामक युवकाची दगडाने ठेचून निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. परंतू पोलिसांनी तात्काळ तपासचक्र फिरवीत दोघांना अटक केल्याचे कळते.
जुने शहरातील सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी शेख शाहरूख गंभीर जखमी अवस्थेत हिंगणा फाटा परिसरात मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती जुनेशहर पोलिसांना मिळताच पथकाने घटनास्थळ गाठले. त्यासोबतच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळकेही पोहोचले. डॉग युनिट बोलावून तातडीने शोध मोहिम राबविली गेली. सोबतच ठसेतज्ज्ञाना पाचारण करून तपासाला गती दिली गेली. पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेतल्याचे कळते. क्षुल्लक वादातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे.
शेख शाहरुख शेख हसन (वय ३० रा. सोनटक्के प्लॉट) आणि अतुल ऊर्फ जॅकी श्रीकृष्ण अहीर (२८) रा. नवीन हिंगणा वाशीम रोड, अभिजित पुंडलि वानखडे (२५) रा. कळंबेश्वर या तिघांमध्ये दोन दिवसांपासून वाद सुरु होता. शाहरुखने त्यांना आई-बहिणीवरून अश्लील शिवीगाळ केली. गुरुवारीसुद्धा त्यांच्यात वाद झाला. शेख शाहरुख याने पुन्हा त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे संतापलेल्या अतुल अहीर व अभिजित वानखडे यांनी त्याच्या डोक्यात दगड घालत, त्याची हत्या केल्याचे कळते.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके आणि जुने शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित अतुल ऊर्फ जॅकी अहीर व अभिजित वानखडे यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी खुनाची कबुली दिल्याचेही कळते.