अकोला (वृत्तसंस्था) एनसीबीचे समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत मुंबई पोलिसांनी माहिती घेतली आहे. प्राप्त माहितीनुसार, समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रासंबंधी तपास आणि माहिती घेण्यासाठी अकोला येथे पोहोचले. अकोला येथील तहसील कार्यालयातून त्यांनी वानखेडे यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्राबाबत माहिती घेतली. समीर वानखेडे यांच्या वडीलांच्या नावासमोर अनुसुचीत जातीचा उल्लेख असल्याची माहिती आहे.
वानखेडे कुटुंब मूळचे वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील आहे. २६ जानेवारी १९९८ पर्यंत अकोला व वाशीम जिल्हा संयुक्त होता. स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आलेल्या वाशीम जिल्ह्यात नंतर रिसोडचाही समावेश करण्यात आला. त्यामुळे १९९८ पूर्वीच्या वाशीम जिल्ह्यातील नागरिकांच्या काही नोंदी आजही अकोल्यात आढळून येतात. त्यामुळे पोलिसांचे पथक अकोल्यात कागदपत्रांची पाहणी करण्यासाठी आल्याची माहिती आहे.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावर नवाब मलिक यांनी आरोप केले होते. वानखेडेंवर आरोप झाल्यानंतर राज्य शासनाकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीसाठी मुंबई पोलिसांचे एक पथक अकोल्यात आले होते. यात एक पोलीस अधिकारी आणि एक कॉन्स्टेबल अशी दोघे जण अकोल्यात आले होते आणि दोन दिवस या पथकाने तहसीलमधून काही माहिती संकलित केल्याची माहिती आहे.
समीर वानखडेंचे वडिल ज्ञानदेव यांची माहिती तहसील कार्यालयातील दस्तऐवजांमध्ये आहे. सन १९९५ मध्ये नोंदवण्यात आलेल्या माहितीनुसार, ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावासमोर अनुसूचित जातीचा उल्लेख असल्याचे समजते. ही नोंद असलेल्या रजिस्टरची प्रत पथकाने घेतली असून प्रत तहसील कार्यालयाने प्रमाणित करून दिल्याचीही माहिती आहे. पण या विषयी अधिकाऱ्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास टाळले.