वाशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेने ड्रोन हल्ला करत दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ठार केलं आहे. अल कायदाचा प्रमुख अल-जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्यानंतर लगेचच संघटनेनं नवीन प्रमुख निवडला आहे.
लादेननंतरचा अमेरिकेसाठी असलेला दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी अल जवाहिरी याचा ड्रोन हल्ल्यात खात्मा झाला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सीआयएने केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरी मारला गेला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी मोहिमेतील हे अमेरिकेचे सर्वात मोठं यश आहे.
जवाहिरीने ९/११ हल्ल्यामध्ये समन्वय साधण्याचं काम केलं होतं. या हल्ल्यात ३००० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. जवाहिरीच्या डोक्यावर २४ मिलियन डॉलर्सचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये रविवारी सकाळी ड्रोन हल्ला केला असता त्यामध्ये जवाहिरीचा मृत्यू झाला.
जवाहिरीला ठार केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी, आता न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त केली. कितीही उशीर लागला, तुम्ही कुठेही लपलात तरी, आमच्या लोकांसाठी धोका असाल तर अमेरिका तुम्हाला शोधून बाहेर काढणार, असा इशारा यानिमित्ताने बायडन यांनी दिला आहे.