अमळनेर (प्रतिनिधी) येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील यांचा सत्कार अध्यक्षा भारती अग्रवाल तर रेणू प्रसाद यांचा सत्कार अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर तालुका संघटक करुणा सोनार यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
याप्रसंगी प्रास्ताविक माजी सचिव विजय शुक्ल यांनी केले तर आधार संस्थेबद्दलची माहिती अश्विनी भदाणे यांनी सांगितली. डॉ. भारती पाटील यांनी याप्रसंगी सत्कारास उत्तर देताना सांगितले की, गेल्या वीस वर्षापासून आधार संस्था ही एड्स निर्मूलनचे काम करीत आहे. गरीब वस्तीत जाऊन व वेश्या व्यवसायात अडकलेल्या महिलांना या भयंकर रोगापासून होणाऱ्या संभाव्य धोके बाबतची माहिती देण्याचे व ह्या या रोगात अडकलेल्या अनेक लोकांना औषधे व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी लागणारे सामान पुरविण्याचे काम ते करीत असतात. श्रीमती प्रसाद यांनी याप्रसंगी सांगितले की, कोविड १९ मध्ये त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला तरी त्यांना न घाबरता त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळोवेळी खेड्यावर जाऊन सुद्धा गरजूंना औषधे व अत्यावश्यक सेवा याप्रसंगी दिली.
याप्रसंगी डॉ. भारती पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे त्यांनी लिहिलेला शोधनिबंध “जळगाव जिल्ह्यातील एचआयव्हीसह सहजीवन जगणाऱ्या महिला एक अध्ययन” या विषयाबाबत शोधनिबंध सादर करून त्यांना विद्यापीठाने डॉक्टरेटची पदवी प्रदान केली. त्याबद्दल त्यांचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे कौतुक केले. याप्रसंगी बहुउद्देशीय संस्थेच्या वैशाली वानखेडे, मनीषा खैरनार, वैशाली शिंगाणे तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे जिल्हा सहसंघटक मकसूद बोहरी व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे नरेंद्र बाळू पाटील, मधुकरराव सोनार, अंजु ढवळे, वनश्री अमृतकर, स्मिता चंद्रात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार करुणा सोनार यांनी मानले.