धुळे (वृत्तसंस्था) आघाडीत सत्तारुढ पक्षातील काही नेते विरोधकांना आवडतील अशी वक्तव्य करीत आहेत. आघाडीत सहभागी असलेले तीनही पक्ष स्वखुशीने सत्तेत आले आहेत. कुणीही कुणाला बळजबरी केलेली नाही. ती जबाबदारी आपण स्वेच्छेने स्विकारली आहे. ती आपली जबाबदारी ओळखूनच आनंदाने पार पाडली पाहिजे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल अण्णा गोटे यांनी केले आहे.
सन १९७८ मध्ये शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुलोदचे सरकार आले. सरकारमध्ये जनसंघ, समाजवादी प्रजासमाजवादी, शेतकरी कामगार पक्ष तसेच काँग्रेस पक्षातील असंतुष्ट नेते व शरद पवारांचा एस. काँग्रेस वगैरे सहभागी होते. मतभेद तेंव्हाही होते. मंत्रीमंडळाच्या बैठकीत तेव्हाही खडाजंगी होत असे. पण चुकून सुध्दा वृत्तपत्रात एकही वेडीवाकडी बातमी आली नाही. याउलट अनेक नेते प्रसिध्दी माध्यमांना स्वतःहून खाद्य पूरवित आहेत. हे काही शोभादायक नाही. आपले हसू होते हे कोणीतरी खडसावून सांगण्याची गरज आहे. हे कटू सत्य सांगण्याचे धाडस कुणीतरी करणे आवश्यक आहे. ही वाईटपणा घेण्याची जबाबदारी मी स्वतःहून स्विकारली आहे. आज आपण आपला पक्ष सत्तेत आहे म्हणूनच आपण काय बोलतो ? याला प्रसिध्दी माध्यमामध्ये वजन आहे किंवा किंमत आहे. सत्ता गेल्या नंतर आपली काय अवस्था होते हे आपण सर्वांनीच मागील गेल्या पाच वर्षात अनुभवले आहे. आपण आत्मघात करुन पदरी काय पाडून घेणार आहोत. याचा अंतर्मुख होऊन प्रत्येकाने स्वतः विचार करावा. अन्यथा, अशा वर्तवणूकीला “भिकेचे डोहाळे लागले” असेच म्हणावे लागेल.
भाजपाचे अति उत्साही व मुख्यमंत्री पदासाठी उतावीळ झालेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना असे काही वक्तव्य आले की, यांना हर्षवायूच होतो. त्यांनी वृत्तपत्रांना लगेच सांगितले की, “शिवसेनेचा व राष्ट्रवादी काँग्रेसचा थरकाप उडाला.” त्याच दिवशी त्याच वर्तमान पत्रात भाजपातील मराठ्याचे नेते अॅड. अशिष शेलार यांनी मात्र “काँग्रेसांचे वक्तव्य गांभिर्याने घेण्याचे आवश्यकता नाही.” असे जाहिर केले. भाजपा नेत्यांनी पक्षांतर्गत असलेली नेतृत्व स्पर्धेचे उगाच जाहिर प्रदर्शन करु नये. बाहेर आपले हसे होते याचे विस्मरण पडू देऊ नका. असाही टोला भाजपाच्या नेत्याला राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी लगावला आहे.