अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर बाजार समितीत दोन दिवसापूर्वी माजी सभापती प्रफुल पवार यांनी न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत पदभार स्वीकारला. यावर आक्षेप घेत शासनाने नेमून दिलेल्या व अशासकीय संचालक मंडळाच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील या आज बाजार समितीच्या सभापती आसनावर आरूढ झाल्या, त्यांच्यासोबत महा विकास आघाडीचे नियुक्त अशासकीय सदस्य हजर होते. त्याचवेळी न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा सभापती झालेले प्रफुल पवार देखील त्या ठिकाणी आसनस्थ झाले. त्यामुळे बाजार समितीत एकाच वेळी दोन सभापती पाहायला मिळाले.
न्यायालयाचा किंवा प्रशासनाचा कुठलाच आदेश मला मिळाला नसल्यामुळे मी सभापती म्हणून विराजमान आहे. न्यायालयाचा निर्णय अमळनेर बाजार समितीला लागू होत नाही, शासनाचे आदेश प्राप्त होत नाही तोवर मीच मुख्य प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहे. असे मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील यांनी सांगितले. तर न्यायालयाच्या आदेशाने आम्ही पुन्हा एकदा सत्तेत आलो आहोत, त्या आदेशाचे पालन करून आम्ही कामकाज सुरू केलेले आहे. न्यायालयाच्या निर्णयात अमळनेर बाजार समितीचा स्पष्ट शब्दात उल्लेख केलेला आहे. आम्हाला बाजार समितीत यायला कुणीही आडवू शकत नाही, आम्ही पुन्हा पुन्हा येणार, असे सभापती प्रफुल्ल पवार यांचे म्हणणे होते.
कायदेशीर कार्यवाही न केल्यास उपोषणाचा इशारा
न्यायालयाच्या आदेशाने आम्ही पुन्हा कार्यभार हाती घेतला आहे. त्यावर कुठलाही आक्षेप घेऊ नये, तरी देखील शासनाकडून नियुक्त केलेले अशासकीय संचालक मंडळ बाजार समितीच्या कामात आम्हाला भाग घेण्यास मनाई करत आहे. यावरून बाजार समितीचा कारभार कुणी पहावा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आमच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, तरी यावर कार्यवाहीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांना पाचारण करण्यात यावे, अन्यथा होणाऱ्या परिणामांना आपण स्वतः जबाबदार रहाल तसेच सदर न्यायालयाच्या निर्णयावर कायदेशीर तोडगा काढावा किंवा लेखी खुलासा करावा अन्यथा उपोषण करण्यात येईल असे पत्रात नमूद केलेले आहे. सदर पत्रावर सभापती प्रफुल्ल पवार, संचालक श्रावण ब्रम्हे, पराग पाटील, प्रकाश पाटील, डी.ए.धनगर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.