अमळनेर (प्रतिनिधी) जळोद कडून गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या पिकअप व्हॅनवर अमळनेर पोलिसांनी २८रोजी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी जळोद रस्त्याकडे उड्डाण पुलाच्या जवळ छापा टाकून सुमारे ११ लाख ३९ हजार ४०० रुपयांचा ५६ किलो ९७० ग्राम गांजा पकडला.
हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार याना गोपनीय माहिती मिळाली की, एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडी क्रमांक MH 18 AJ 0223 मधून अमळनेर शहरात अमली पदार्थ गांजा विक्रीसाठी येत आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना माहिती देताच डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना सोबत घेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, उज्वल म्हस्के, उदय बोरसे, प्रशांत पाटील, विनोद संदानशीव, निलेश मोरे, नितीन कापडणे, गणेश पाटील, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे यांच्यासह फॉरेन्सिक पथक, पंच, फोटोग्राफर असा ताफा घेऊन रात्री साडे दहा वाजता पोलीस उड्डाण पुलाच्या अलीकडे ऍड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या पुढे दबा धरून बसले. रात्री १० वाजून ५० मिनिटांनी पोलिसांनी गाडी अडवली. चालकाला नाव विचारले असता त्याने त्याचे नाव मनोज सोनू पावरा (वय २४ रा महादेव सोनपाडा ता शिरपूर) व त्याच्यासोबत असलेला सीताराम वेळू सोनवणे (वय ५२ रा वलवाडी जिल्हा बडवाणी मध्यप्रदेश) असल्याचे समजले.
पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यात १८ बंद असलेली पाकीटे आढळली. त्यात ओलसर गांजा रोपांची शेंडे आढळली. पोलिसांनी वजन केले असता त्यात विविध मापाच्या पाकिटात एकूण ५६ किलो ९७० ग्राम वजनाचा ११ लाख ३९ हजार ४०० रुपये किमतीचा गांजा आढळला. पोलिसांनी गांजा सह ८ लाख रुपये किमतीची बोलेरो असा एकूण १९ लाख ३९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चालक मनोज पावरा आणि सीताराम सोनवणे यांच्या विरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८ (क), २० (ब)(२ क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.