मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आव्हान देण्याची भूमिका शिवसेना (ठाकरे) उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी घेतली असून, लवकरच न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत राष्ट्रपतींना पत्राद्वारे तक्रार करणार आहेत.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात नाट्यमयरीत्या शिवसेना उमेदवार रवींद्र वायकर ४८ मतांनी विजयी झाले. सुरुवातीला मतमोजणीनंतर अमोल कीर्तिकर यांना ६८१ मतांनी विजयी झाल्याची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर वायकर यांनी फेरमतांची मागणी केली. अधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावली; परंतु वायकर फेरमतमोजणीवर ठाम राहिले. यामध्ये ७५ मतांनी वायकर आघाडीवर आले. तसेच पोस्टल मतांची फेरमोजणी केली. यात १११ मते बाद करण्यात आली. कीर्तिकर यांनी यावर हरकत घेतली. तसेच तीन ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने व्हीव्हीपॅट मतांची फेरमोजणी करावी, अशी मागणी केली.
निवडणूक अधिकारी आणि सेनेच्या पोलिंग बूथच्या मोजणीत ६५२ मतांची तफावत आढळून आल्याचे म्हटले; परंतु निवडणूक अधिकाऱ्यांकडे अधिकृत आकडेवारी असून, सेनेच्या पोलिंग एजंटची मोजणी चुकीची आहे, असे सांगत वायकर ४८ मतांनी विजयी झाल्याची घोषणा केली. कीर्तिकर यांनी निर्णयावर आक्षेप घेतला असून, न्यायालयात आव्हान देणार आहेत. यात ६५२ मतांबाबत निर्णय घेण्याची मागणी केली जाणार आहे. त्यामुळे न्यायालय यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, येत्या काळात या निकालाचे प्रकरण चांगलेच चिघळण्याची चिन्हे आहेत.