अमरावती (वृत्तसंस्था) पोटच्या मुलानेच चुलत भावाच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस शनिवार, २० मे रोजी सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाअंती दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. सतीश गंगाधर कुरटकार (वय ४२, रा. जळगाव आर्वी, धामणगाव रेल्वे) असे मयताचे तर मुलगा अभी सतीश कुरटकार (वय १९, रा. जळगाव आर्वी व पुतण्या यश जगदीश कुरटकार (वय १९, रा. खडकसावंगा, यवतमाळ) असे अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत.
या संदर्भात अधिक असे की, शनिवार, २० मे रोजी सकाळी तरोडा जगताप शिवारातील एका शेतात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. कुऱ्हा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर मृतदेहावर धारदार शस्त्राचे वार दिसून आले. त्यानुसार स्थानिक एलसीबीने पथक स्थापन करत खुनाच्या गुन्ह्याचा तपास सुरु केला होता. त्यानुसार पथकाने मृतकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले होते.
अगदी मृतकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. अवघ्या काही तासात मृतक हा सतीश कुरटकार असून तो जळगाव आर्वी येथील जावई असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने सतीश कुरटकार यांच्या कुटुंबीयांची भेट घेत चौकशी केली. सतीश कुरटकार यांनी शुक्रवार, १९ मे रोजी सकाळी दारूच्या नशेत पत्नी व मुलांना मारहाण केली होती. तसेच ते नेहमीच कुटुंबीयांना दारू प्राशन करून मारहाण करीत होते. त्यामुळे मुलगा अभी हा त्रस्त झाला होता.
वडिलांचा नेहमीचा त्रास असह्य झाल्याने १९ मे रोजी सायंकाळी अभी आणि यश हे सतीश यांना बाहेर नाश्ता करण्यासाठी घेऊन गेले. त्यानंतर रात्री नऊ वाजताच्या सुमारास तरोडा परिसरात अभी आणि यश या दोघांनी कुऱ्हाड आणि चाकूने सतीश यांच्यावर वार करुन त्यांचा खून केला आणि ते घरी निघून आलेत, असे पोलीस चौकशीत समोर आले. त्यानुसार दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे मुलांना खून करण्यासारखे मोठे पाऊल उचलावे लागल्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे.
















