जळगाव, (प्रतिनिधी) : अनुभूती बाल निकेतन आणि अनुभूती विद्या निकेतन स्कूल चा ‘फाउंडर्स डे–2025’ उत्साहात झाला. स्कूलचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाल निकेतन आणि विद्या निकेतनच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारातून भारतीय संस्कृतीचे अप्रतिम दर्शन घडविले. यावेळी उपस्थित पालक मंत्रमुग्ध झाले.
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, शोभना जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, फरहाद गिमी, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या अंबिका जैन, अनुभूती बालनिकेतन आणि विद्या निकेतनचे प्राचार्य मनोज परमार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. उपस्थितीतांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले.
सुरुवातीला विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना सादर केली. ‘तेरा मंगल मेरा मंगल…’ या गीतावर अनुभूती स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन म्हणजेच दादाजी यांची भूमिका करणाऱ्या निवेदकाचे आगमन झाले. हा क्षण सोहळ्याचे आकर्षण ठरला. कीर्ती पगारिया, स्मिता काटकर यांनी भवरलालजी जैन यांची जीवनदर्शन आपल्या प्रास्ताविकातून मांडले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘भारत प्यारा’ हे समूहगीते प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेला. तसेच संस्कृत वर्णमाला गीत, कृष्ण, राम कथा सादरीकरण आणि ‘रामराज्य’ नाटिका यामुळे पौराणिक कथांचा उलगडा नाटिकांतून चिमुकल्यांनी केला. जीवनातील अध्यात्म, साधेपणा, भक्तीभाव आणि मानवी मूल्यांचे विद्यार्थ्यांनी अभिनयातून दर्शन घडवले. महाराष्ट्रातील सणांवर आधारित नृत्याने राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक उपस्थितांसमोर चिमुकल्यांनी उभी केली. कलेसह आरोग्याची जाण जपणारे सादरीकरण सुद्धा झाले. उपस्थितांनी भरभरून दाद दिली. योगा, झुम्बा आणि ॲरोबिक्सच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी सुदृढ शरीराचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. यावेळी अंबिका जैन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, माळी रोपांची निगा राखतो, त्याप्रमाणे शाळेतील शिक्षक मुलांची निगा राखून त्यांना सुज्ञ नागरिक बनवतात. मुलांनी देखील नेहमी हसत खेळत राहावे, जिज्ञासू रहावे, प्रश्न विचारावे, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य मनोज परमार यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘वंदे मातरम’ ने कार्यक्रमाचा समारोप झाला.
















