छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) धनलाभ आणि मुलाचे चांगले व्हावे म्हणून जन्मदात्या आईने मुलीस जिवंत जाळून तिचा बळी देण्याचा प्रयत्न केला. झोपेतच तिच्या अंथरुणावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. वेळीच जाग आल्याने ही तरुणी बालंबाल बचावली. ही घटना मागील गुरुवारी (दि. १७) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास फुलेनगर, आंबेडकरनगर परिसरात घडली. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून सिडको ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून मातेसह अन्य एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्वती दादासाहेब हुलमुख (४०, रा. गल्ली क्र. १, फुलेनगर, आंबेडकरनगर) आणि शकुंतला आहेर (रा. मिसारवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. तर सुप्रिया दादासाहेब हुलमुख (२०) ही घटनेत जखमी आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.
पहाटे साडेचार वाजता अंथरुणावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न !
सुप्रिया ही ग्रीव्हज कॉटन कंपनीत काम करते. १२ वर्षांपूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले. आई पार्वती हुलमुख, मोठा भाऊ प्रसाद यांच्यासह ती तिथे राहते. पार्वती ही जादूटोण्याचे प्रयोग करणाऱ्या शकुंतला आहेर हिची सतत भेट घेत असते. शकुंतला ही पार्वतीला तिच्या मुलाचे चांगले व्हावे आणि धनलाभ व्हावा म्हणून मुलगी सुप्रियाचा जिवंत बळी देण्याचे सांगत होती. तिच्या भूलथापा व अंधश्रद्धेला बळी पडून पार्वतीने मुलीचा बळी देण्याचे ठरवले. बुधवारी रात्री सुप्रिया वरच्या मजल्यावर खोलीत झोपली होती. गुरुवारी (दि. १७) पहाटे साडेचार वाजता तिच्या अंथरुणावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. मात्र काही क्षणात सुप्रियाला जाग आली. तेव्हा तिच्या अंगावरील गोधडीने पेट घेतला होता. गोधडी दूर फेकून आरडाओरड करीत ती खालच्या मजल्यावर पळत आली.
भाऊने बहिणीच्या कपड्यांना लागलेली आग तातडीने विझविली !
दरम्यान, तिची आई पार्वती समोरच उभी होती. तिने सुप्रियाला काहीही मदत केली नाही. मात्र सुप्रियाचा भाऊ प्रसाद धावत आला. त्याने त्याच्याकडील गोधडीने सुप्रियाच्या कपड्यांना लागलेली आग तातडीने विझविली. झोपेत पेटवून देण्याचा हा प्रकार सुप्रियाला प्रचंड धक्कादायक वाटला. तिने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे ठरवले. ती तक्रार देण्यासाठी घरातून निघाली असता आई पार्वतीने तिला अडवले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. पार्वतीने सुप्रियाला तक्रार देण्यासाठी येऊ दिले नाही. २१ ऑगस्टला पार्वती घरी नसताना सुप्रियाने सिडको ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांची भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तिला मेडिकल मेमो दिला. वैद्यकीय तपासणीनंतर तिची फिर्याद घेण्यात आली. त्यावरून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
आधी गळा दाबून मारण्याचा प्रयत्न !
पार्वती हुलमुख अंधश्रद्धेच्या आहारी गेली आहे. जादूटोण्याचे प्रयोग करणारी शकुंतला आहेर हिने तिला मुलीला जिवंत मारून टाकले तर तुला धनलाभ होईल आणि मुलाचे चांगले होईल, असे सांगितले होते. तेव्हापासून पार्वती हुलमुख ही मुलगी सुप्रियाच्या जीवावर उठली होती. यापूर्वीही तिने तिला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला होता. ती सिडको ठाण्यातही आली होती.