यावल प्रतिनिधी । शहरात बोरावल गेट जवळ अंडा भुर्जी विक्रेत्याने किरकोळ कारणावरून ग्राहकाच्या डोक्यात लोखंडी दांड्याचा तवा मारून गंभीर जखमी केल्याची घटना गुरूवारी घडली आहे. यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबात अधिक असे की, सुधाकर ज्ञानेश्वर सपकाळे (वय २६) हा तरूण गुरूवार २५ जुलै २०२४ रोजी रात्री यावल शहरातील बोरावल गेट जवळ पराग आमलेट सेंटर येथे अंडा भुर्जी घेण्यासाठी गेला. अंडा भुर्जी विक्रेता पराग जगदीश चौधरी (रा. सुंदर नगरी, यावल) यांचे दुकानावर असता तेथे पराग चौधरी यांच्याशी अंडा भुर्जी विकत घेण्याचे कारणावरून वादविवाद झाला.
वाद विकोपाला जाऊन अंडा भुर्जी विक्रेता पराग चौधरी याने त्याचे दुकानात असलेल्या लोखंडी दांड्याच्या तव्याने सुधाकर ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या डोक्यात जोराने मारहाण करून त्यास दुखापत केली. जखमीस औषधोपचारासाठी तात्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमीच्या डोक्यातून रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने पुढील औषधोपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथे रवाना करण्यात आले. शरद जनार्दन सपकाळे (वय ४६ रा. पिंपरी ता. यावल) यांनी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून यावल पोलीस स्टेशनला अंडा भुर्जी विक्रेता पराग जगदीश चौधरी याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
















