जळगाव (प्रतिनिधी) नशिराबाद गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला सुसाट ऑईल टँकरने जोरदार धडक दिल्याने दोन चटई कामगारांचा जागीच मृत्यू झाला. संदिप मानसिंग शिरसाम (२८), वसंत मुन्ना वरखेडे (२८, दोन्ही रा. धामण्या, जि. बैतूल, मध्यप्रदेश) असे दोन्ही मृत कामगारांची नावे आहेत.
मुळ मध्यप्रदेशातील आदीवासी तरुण संदिप मानसिंग शिरसाम आणि वसंत मुन्ना वरखेडे असे दोघेही एमआयडीतील वेगवेगळ्या कंपनीत कामाला होते. (एमपी ४८ एमआर ५३९७) या क्रमाकांच्या दुचाकीने संदीप आणि बसंत हे दोघंही कंपनीत अर्ध्या दिवसाची सुटी घेऊन रविवारी दुपारी गावी जाण्यासाठी निघाले. यादरम्यान जळगाव तालुक्यातील नशिराबादजवळ भुसावळकडून जळगावच्या दिशेने येणाऱ्या (एमएच ०४ डीएस २२१७) या क्रमाकांच्या भरधाव ऑईलच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील संदीप आणि वसंत यांना डोक्याला व हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रविवारी अर्ध्या दिवसाची सुटी घेऊन दोघेही गावी निघाले होते. गावी जाऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी ते रात्रपाळीत कंपनीत कामाला येणार होते. मात्र, गावी घरी पोहचण्यापूर्वीच दोघांना मृत्यूने गाठले.मयत संदीप शिरसाम याच्या पश्चात आई, वडील पत्नी, दोन वर्षाचा मुलगा, तीन वर्षाची मुलगी, दोन भाऊ, दोन विवाहित बहीणी, तर वसंत याच्या पश्चात आई-वडील, पत्नी दोन वर्षाची मुलगी, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे. दोन्ही तरुणाच्या चिमुकल्यांचे कोवळ्या वयातच पितृछत्र हरपले आहे.