धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयात नुकतेच युगपुरुष स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने दोन दिवस शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व स्नेहसंमेलन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.
पहिल्या दिवशी दिनांक १२ जानेवारी रोजी पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर धानोरे गावचे माजी सरपंच भगवानभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक रामनाथ चिंधु पाटील हे उपस्थित होते.सोबत प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटिया, संस्थेचे सचिव प्रा रमेश महाजन,घनश्यामसिह बयस,रघुनाथ चौधरी,सौ.शोभाताई चौधरी,ललित उपासनी,सुशीलभाई गुजराथी,ऍड.राजेंद्र येवले,शांताराम महाजन,प्रदीप मालपुरे,हेडगेवार ग्रामपंचायतच्या सरपंच सविताताई सोनवणे,ग्रामपंचायतचे उपसरपंच चंदनभाऊ पाटील,सदस्या शीलाताई देशमाने त्याचप्रमाणे मुख्याध्यापक जीवन पाटील ,मुख्याध्यापक एस. एस. पाटील उपस्थित होते.उद्घाटक भगवान महाजन यांच्या हस्ते मागच्या वर्षी इयत्ता दहावीमध्ये प्रथम,द्वितीय व तृतीय आलेले विद्यार्थी व वेगवेगळ्या विषयांमध्ये विशेष गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.सोबत त्याचप्रमाणे क्रीडाक्षेत्रात, कलाक्षेत्रात, तसेच शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या स्पर्धापरीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व विज्ञानक्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरवही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना भगवान महाजन यांनी सांगितले की, माझं बालपण हे अतिशय गरीब व कष्टकरी कुटुंबात झाले असून केवळ शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि आई वडिलांच्या प्रबळ संस्काराने व अथक परिश्रमाने आज मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर या पदापर्यंत जाऊ शकलो. विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अंगी जर कष्ट करण्याची जिद्द असेल तर तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते, यात शंका नाही ,असे स्वतःच्या जीवनातील अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना भगवान महाजन यांनी प्रेरणा दिली. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक संकटे, घडामोडी सोबत खडतर परिस्थितीला दिलेले तोंड प्रामाणिकता सच्चाई व कष्ट या बळावर आज भगवान महाजन पंचक्रोशीत एक प्रेरणास्थान आहे . कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या ईशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आली .१२ जानेवारी रोजी दुपारच्या सत्रात शालेय स्तरावरील व वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना शाळेतील पालक शिक्षक संघाचे या पदाधिकारी अश्विनीताई शिंपी,यामिनी लोहार,दिपमाला चौधरी यांच्याहस्ते व संस्थेचे संचालक मंडळ यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच 13 जानेवारी रोजी शहरातील अर्बन बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन प्रवीणभाऊ तुकाराम कुडे यांच्या हस्ते रंगमंचाचे पूजन करून शाळेचा आनंद तरंग हा सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये येणाऱ्या २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा यावर आधारित प्रभू श्रीराम हा मूळ विषय घेऊन विद्यार्थ्यांनी अतिशय नयनरम्य व उत्कृष्ट पद्धतीचे सादरीकरण प्रेक्षकांसमोर केले.प्रेक्षकांनी चक्क येणाऱ्या सोहळ्याचे स्वरूप व उत्साह कसा असेल हेच साक्षात अनुभवले असे म्हणा. यासोबतच इतर मुलांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक प्रसंग सादर करतांना शिवराज्याभिषेक ला ह्यावर्षी ३५० वर्ष पूर्ण झाल्याने त्या विषयावर देदीप्यमान सादरीकरण केलीत, तसेच धार्मिक, शेतकरी ,आदिवासी, अहिराणी गीत, पारंपारिक गीते व समाज प्रबोधनपर स्वच्छता विषयावर असे अनेक विषयांचे मांडणी करून शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमांमध्ये शाळेतील बालक मंदिर विभाग व प्राथमिक गटातील एकूण ६०० विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे परिपूर्ण वेशभूषेसह सोबत उत्तम अभिनयाची जोड घेऊन कार्यक्रम उत्तम सादर केलेत. ह्या कार्यक्रमांसाठी हजारोंच्या संख्येने आलेले पालक वर्ग , मान्यवर यांनी सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जीवन पाटील यांनी केले, तर अध्यक्षीय भाषणात रामनाथ पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व व सोबत कलागुण सांभाळणे किती महत्त्वाचे असते, याच्याने संस्थेचा विकास होत असतो असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमासाठी समाजातील थोर दातृत्व असलेले कार्यक्रमाचे उद्घाटक भगवानभाऊ महाजन ,संदीप पाटील,प्रवीणभाऊ कुडे,विनय भावे,चंदन पाटील,सविताताई सोनवणे,सचिन बागुल,वैशाली ताई बडगुजर तसेच गावातील मान्यवरांनी सुद्धा चिमुकल्यांच्या कार्यक्रमासाठी आर्थिक स्वरूपात भरीव मदत केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समितीचे प्रमुख कैलास माळी व किरण चव्हाण यांनी तर प्रस्तावित पी.पी. रोकडे यांनी तसेच बक्षीस वितरण सूत्रसंचालन के.जे.पवार ,सागर पाटील,जे.एम.पाटील व एन.बी.ठाकरे यांनी केले.तर आभार संस्थेचे संचालक ललित उपासनी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक समितीतील सदस्य पल्लवी मोरे ,सरोज तारे, रजनीराणी पवार, शितल वानखेडे व नीता महाजन शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.