हिंगोली (वृत्तसंस्था) बहिणीचा फोटो मोबाईलमध्ये का ठेवले ? असा सवाल करत मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना हिंगोलीत (Hingoli Murder) घडली. जिल्ह्यातील औंढा नागनाथ (Aundha Nagnath) तालुक्यातील ढेगज येथे हा प्रकार घडला. शुभम आडे (वय १६) या मुलाचा गळा दाबून खून झाल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर औंढा नागनाथ पाेलिस ठाण्यात एका तरुणासह त्याच्या अन्य मित्रांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील ढेगज येथील शुभम अंकुश आडे हा मुलगा गुरुवार २१ पासून बेपत्ता होता. त्यानंतर त्याच्या घराच्या शेजारीच एका बाथरुममध्ये त्याचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंगरे, उपनिरीक्षक सुवर्णा वाकळे, यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरात अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, उत्तरीय तपासणीमध्ये मयत शुभम याचा गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात अंकुश यांच्या तक्रारीवरून उद्धव गोपीचंद चव्हाण आणि त्यांच्या इतर मित्रांवर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
बहिणीचा फोटो मोबाइलमध्ये ठेवल्याचा राग
पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. शुभमने आरोपीच्या बहिणीचा फोटो मोबाइलमध्ये ठेवला होता. त्यामुळे दोघांमध्ये खडाजंगी झाली होती. आरोपीने शुभमला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. आपल्या बहिणीचा फोटो काढल्याचा राग मनात ठेवून आरोपीने इतर मित्रांच्या मदतीने शुभमचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी शुभमच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादी वरून औंढा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.