जळगाव(प्रतिनिधी) : शहरातील कुंभार वाड्यात दि ३१ रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराबाहेर उभ्या दुचाकीवर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील शनिपेठ परिसरात असलेल्या कुंभार वाड्यातील रहिवासी अमीर जावेद खाटीक हे आपल्या परिवारासोबत येथे वास्तव्यास आहेत. मटण-चिकन विक्रीचा व्यवसाय करुन कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवतात. बुधवारी (ता. ३१) अमीर खाटीक कुटुंबीयांसह बाहेरगावी मध्यप्रदेशात गेले होते. घरबंद असल्याची संधी साधत मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींने त्यांच्या घराबाहेर उभी मोटारसायकल पेटवून दिल्याची घटना घडली.
मोटारसायकल पेटवल्याने आगीचा भडका उडून घराचा काही भागही जळाला आहे.सकाळी खाटीक कुटुंबीय परतल्यावर त्यांना घर आणि दुचाकी जळाल्याचे आढळून आले. त्यांनी शनिपेठ पोलिसात धाव घेतली. त्याचप्रमाणे परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केल्यावर एक दुचाकीस्वार दूरवर वाहन लावून पायी चालत आला. नंतर त्याने खिशातून पेट्रोलची बॉटल काढून वाहनावर ओतून पेटवून दिल्याचे आढळून आले आहे. वाहन पेटवणारा खाटीक कुटुंबीयांचा जवाई आदिल ऊर्फ शाहरुख सलिम खाटीक असल्याचे फुटेजवरुन स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी जावयाविरुद्ध खाटीक कुटुंबीयांनी तक्रार दिल्यावरून शनिपेठ पोलिसांत (Police) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.