भुसावळ (प्रतिनिधी) येथील महिलेची 60 लाख 70 हजार रुपये घेऊन गाळे खरेदी न देता फसवणूक केल्याप्रकरणी अनिल छबिलदास चौधरी यांच्यावर जानेवारी 2021 मध्ये फौजदारी कलम 420 504 506 अन्वये भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्या प्रकरणात अनिल चौधरी यांचा अटक पूर्व जामीन अर्ज भुसावळ सत्र न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला होता.
त्यानंतर अनिल चौधरी यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. सर्वोच्च न्यायालयाने महिलेकडून घेतलेली फसवणुकीची संपूर्ण रक्कम रुपये 60 लाख 70 हजार रुपये दिवाणी न्यायालयात भरावे त्यानंतरच तुमच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येईल असे आदेश दिले. त्यानुसार अनिल चौधरी यांनी भुसावळ येथील दिवाणी न्यायालयात सदरची संपूर्ण रक्कम भरली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले होते. सदर जामीन अर्जावरील सुनावणी दि. 18 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयात झाली. परंतु, अनिल चौधरी यांच्या वकिलांनी आम्हास आमचे म्हणणे मांडण्यासाठी कोर्टाने वेळ द्यावा अशी विनंती केली. त्यामुळे सदर जामीन अर्जावरील सुनावणी ही जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. जुलै मध्ये होणाऱ्या सुनावणीत अनिल चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळला जातो का की त्यांना जामीन मिळतो यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.