नागपूर (वृत्तसंस्था) सीबीआयच्या छापेमारीनंतर प्रथमच माध्यमांसमोर आलेल्या अनिल देशमुख यांनी फार काही बोलण्याचे टाळत, मोजक्या शब्दांमध्येच प्रतिक्रिया दिली. “सीबीआयची टीम घरी तपासणीसाठी आली होती. त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. आता मी नागपुर जिल्ह्यात ज्या पद्धतीने कोरोना वाढतो आहे, या पार्श्वभूमीवर काही कोविड सेंटरला भेट देण्यासीठी काटोलला चाललो आहे.” असं अनिल देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरासह, कार्यालयांमध्ये झाडाझडती देखील सीबीआयने घेतली आहे.
तसेच, “सीबीआयच्या पथकाला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करून मी कोरोनाच्या अनुषंगाने काटोल व नरखेड येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रांची पाहणी करण्यासाठी निघालो आहे.” असं ट्विट देखील अनिल देशमुख यांनी केलं आहे.