जळगाव (प्रतिनिधी) भाजपच्या ९९ उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर शिवसेना-शिंदे गटाच्या पहिल्या यादीकडे लक्ष लागले होते. आज दि.२२ रोजी रात्री ११ वाजता शिवसेना-शिंदे गटाने पहिल्या ४५ उमेदवारांची यादीची घोषणा केली असून यात जळगाव जिल्ह्यातील ५ उमेदवारांचा समावेश आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मुक्ताईनगरातून आ.चंद्रकांत पाटील यांना संधी मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून आचारसंहिता लागल्यानंतर भाजपने पहिली यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. आज महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना-शिंदे गटाने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात जळगाव जिल्ह्यातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जळगाव ग्रामीणमधून तर पाचोरामधून किशोर पाटील यांना संधी देण्यात आली आहे. एरंडोल-पारोळामधून आ. चिमणराव पाटील यांचे पुत्र अमोल चिमणराव पाटील हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
भाजपकडून दावा केला जात असलेल्या मुक्ताईनगर मतदार संघातून आ. चंद्रकांत पाटील यांना संधी देण्यात आली आहे. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. त्यामुळे भाजपच्या हातून पारंपरिक असलेला मुक्ताईनगर संघ गेलेला आहे.
चोपडा विधानसभा मतदार संघातून आ. लताताई सोनवणे यांच्या जागी त्यांचे पती माजी आ.चंद्रकांत सोनवणे पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिंदे गटाने आज त्यांची देखील उमेदवारी जाहीर केली आहे. भाजप व शिवसेनेने बहुतांश उमेदवार जाहीर केले असून आता महाविकास आघाडीकडून कुणाला संधी देण्यात येते याबाबत उत्सुकता शिगेला लागली आहे. महाविकास आघाडीची यादी बुधवार दि.२३ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
















