नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संपत्तीसाठी मुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे. पैशाच्या हव्यासापोटी लेकाने आईवडिलांवरच गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला. तर वडील गंभीररित्या जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या खुर्जा जंक्शन चौकी परिसरात ही संतापजनक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या मुलाने गोळावार केल्याने त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंजू देवी असं या 55 वर्षीय महिलेचं नाव असून त्या विमला नगर कॉलनीत राहत होत्या. मंजू देवी यांचे पती ओमप्रकाश यांना डोक्याच्या मागच्या बाजुला गोळी लागली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमप्रकाश यांच्यावर मेरठमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणी अनेकांची चौकशी करत असून नेमकं काय घडलं याचा तपास करत आहेत.
ओमप्रकाश यांनी आपली जमीन 12.5 लाखांना विकली होती. या पैशाने त्याने दुसऱ्या ठिकाणी जमिनीचा एक तुकडा विकत घेतला. ओमप्रकाश हे पैसे आपली दोन मुलं आणि सुना यांच्यापैकी फक्त एकावरच खर्च करत होते. त्यामुळे त्याचा दुसरा मुलगा यतेंद्र हा खूप नाराज असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली, यतेंद्र आपल्या वृद्ध आईवडिलांशी यावरून नेहमीच वाद घालत असे. रोज त्यांच्यामध्ये भांडणं होत असल्याचं देखील गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. त्यामुळे संपत्तीतून त्याने गोळ्या झाडल्याचं आता समोर आलं आहे.