पाटणा (वृत्तसंस्था) बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील एका पुजाऱ्याने मंदिरात पूजा करण्यासाठी आलेल्या महिलेला केस पकडून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओनंतर मंदिर कमिटीने पुजाऱ्याविरुद्ध कारवाई केली असून या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.
ही घटना दरभंगाच्या राज परिसरातील श्यामा माई मंदिराच्या पायऱ्यांवर घडली. येथे पुजाऱ्याने मंदिरात आलेल्या महिलेचे केस पकडून तिला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ एकाने शूट केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मंदिर कमिटीच्या निर्देशनास आला. मंदिर कमिटीने तात्काळ कारवाई करत मंदिराच्या पुजाऱ्याला मंदिरासंबंधी कामापासून दूर केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे सर्वसामान्यांसाठी मंदिराचे दरवाजे बंद आहेत. मात्र, ही महिला दरवाजा उघडण्याची मागणी करत, मंदिरात जाऊन श्यामा माईची पूजा करण्याचा हट्ट करत होती. यामुळे संतप्त झालेल्या पुजाऱ्याने महिलेचे केस पकडून तिला मारहाण केली. संबंधित घटनेच्या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत मंदिर कमिटीचे सदस्य चौधरी हेमचंद्र रॉय यांनी म्हटले आहे की, ‘कुठल्याही महिलेसोबत असे वर्तन करणे योग्य नाही. संबंधित पुजाऱ्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.’
दरम्यान, या घटनेसंदर्भात संबंधित महिलेकडून अद्याप कसल्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. या महिलेची ओळखही अद्याप पटू शकलेली नाही.
















