बोदवड (प्रतिनिधी) शहरातील बोदवड जामठी रस्त्यावरील डॉ.आंबेडकर चौकातील सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपंचायतच्या दूर्लक्षामुळे धोकादायक अवस्थेत असलेल्या नालीत आज पुन्हा अपघात झाला.
एक दुचाकीस्वार अंदाज न आल्याने नालीत पडला. सुदैवाने वेग कमी असल्यामुळे किरकोळ दुखापतीवर भागले. काही दिवसांपूर्वी एक कार सुद्धा एका बाजूने चाके नालीत गेल्याने फसली होती. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अखत्यारीत असून त्यावरील ही नाली थोडी तिरपी असून त्यावरील धाप्याची लांबी कमी आहे. त्या ठिकाणी नगरपंचायतने मुतारी बांधली आहे. या नालीचा उघडा भाग झाकण्यासाठी फरशी ठेवतात. मात्र, ती वाहनांच्या येण्याजाण्याने तुटून जाते. समोर वाहन असल्यास किंवा मोठे वाहन जवळून गेल्यास पायी चालणारे, दुचाकीस्वार बरेचदा नालीत पडतात. या दुचाकीस्वारास तात्काळ लोकांनी उचलले व दुचाकी बाहेर काढली. यावेळी तिथे उपस्थित नागरिक नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागावर चांगलेच तोंडसुख घेत होते.